
कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आहे. त्याचं कारण म्हणजे आई तुळजाभवानीने महिषासुराच्या अंताचा ध्यास घेऊन बालरूप धारण केलं आहे.

दैवी लीला काही वेळा अनाकलनीय ठरताच. गूढ वाटू लागतात. अशीच काहीशी परिस्थिती सध्या सटवाईची आहे. बालरुपातल्या तुळजाचं मानवी रुपातलं भविष्य ती काय लिहिणार, हा पेच तिच्यासमोर आहे आणि साऱ्या त्रैलोक्याचं लक्ष त्यावर आहे.

तिकडे दैवी शक्ति बाळरूपात असल्याचे स्पष्ट संकेत महिषासुराला मिळाले असले तरी, त्याचा उन्मत्त स्वभाव ते संकेत कळूनही मान्य करायला तयार नाही. तुळजाला प्राप्त करणं हा एकच ध्यास त्याने घेतला आहे. त्यासाठी माझं भविष्य मी घडवणार हा त्याचा गर्व सध्या जास्त प्रबळ आहे.

एखाद्याच्या लल्लाटी भविष्य लिहिणं हे सटवाईचं सोपं काम. परंतु इथे मात्र ते प्रचंड गुंतागुंतीचं ठरत आहे. त्यातली उलगडत जाणारी लीला मात्र तितकीच विलक्षण आश्चर्यकारक ठरणार आहे, जी थेट महिषासुराच्या अंताची सुरुवात ठरेल.

बालरुपातल्या तुळजाभवानीचं मानवी रुपातलं भविष्य लिहिणाऱ्या देवी सटवाईची गोष्ट प्रेक्षकांना 'आई तुळजाभवानी' या मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.