SI vs AUS : आई मंदिराबाहेर फुलं विकायची, आज मुलगा बनला ऑस्ट्रेलियाच्या मार्गातला मोठा काटा, एकट्याने सगळी मॅचच फिरवली
SI vs AUS : कुठल्याही टीम गेममध्ये सांघिक कामगिरीच्या बळावर विजय मिळवता येतो. पण कधी-कधी एखादा खेळाडू स्वबळावर चमत्कारिक प्रदर्शनाने सगळ चित्रच पालटतो. क्रिकेटमध्ये सुद्धा दीर्घकाळापासून असचं सुरु आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुद्धा हा सिलसिला थांबलेला नाही.

काल श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात एका खेळाडूने स्वबळावर मॅचच चित्र पालटलं. तो या सामन्यात विलनही ठरु शकला असता. त्याचं नाव आहे पथुम निसांका. त्याने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिलं शतक झळकावलं. श्रीलंकेला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवून दिला.

या मॅचमध्ये 16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने एक उंच शॉट मारला. पण निसांका सोपा झेल पकडू शकला नाही. ऑस्ट्रेलिया त्यावेळी मोठ्या स्कोरच्या दिशेने जात होता. कॅच सोडल्यामुळे निसांकाला जबाबदार धरता आलं असतं. पण तुमच्यात हिम्मत असेल तर नशीब सुद्धा पडल्यानंतर पुन्हा उठण्याची संधी देते.

निसांकाने 52 चेंडूत शतक झळकावलं. त्याने 100 धावा करताना 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. निसांकाने आधी कुसल मेंडिस सोबत मिळून 97 धावा आणि पवन रत्नायकेसोबत मिळून 79 धावांची भागीदारी करुन टीमला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवलं.

17 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीपचा शॉट मारला. यावेळी चेंडू हवेत होता. बॉल वेगाने बाऊंड्रीच्या दिशेने जात होता. यावेळी बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या निसांकाने डाइव्ह मारुन अशी कॅच पकडली की सगळेच थक्क झाले.

श्रीलंकेत गॉल येथे जन्मलेला पथुम निसांका 5 वर्षांपासून श्रीलंकन टीमचा हिस्सा आहे. गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडिल ग्राउंड्समॅन म्हणून काम करायचे. घर चालवण्यासाठी आई मंदिराच्या बाहेर फुल विकायची. या 5 वर्षात निसांकाने श्रीलंकन टीममध्ये आपली जागा पक्की केली आहे.