
शुक्र या ग्रहावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 243 दिवसांएवढा असतो. कारण शुक्र ग्रह त्याच्या अक्षावर खूप हळू फिरतो. असं असलं तरी शुक्र ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवरील फक्त 225 दिवस लागतात.

शुक्र ग्रहाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हा ग्रह उलट दिशेने फिरतो. म्हणजेच या ग्रहावर सूर्य पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो, ही क्रिया पृथ्वीच्या अगदी विरुद्ध आहे.

शुक्र ग्रहावरील ढगांमधून सल्फ्यूरिक अॅसिडचा पाऊस पडतो. मात्र हा पाऊस पृष्ठभागावर पोहोचत नाही, कारण जास्त तापमानामुळे या पावसाचे बाष्पीभवन होते. शुक्र ग्रहावर 1600 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत.

शुक्र ग्रहाला अनेकदा 'पृथ्वीची बहीण' म्हटले जाते, कारण शुक्राचा आकार आणि रचना पृथ्वीसारखीच आहे. मात्र या ग्रहावर मानव जिवंत राहू शकत नाही.

सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. त्यानंतर शुक्र ग्रह आहे, मात्र शुक्राचे तापमान बुधापेक्षा जास्त आहे. या ग्रहाचे सरासरी तापमान 463 अंश सेल्सिअस आहे. याचे कारण म्हणजे शुक्राच्या वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त आहे.