
बांगलादेशने पाकिस्तानला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 पराभूत करत इतिहास रचला. पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची किमया साधली. यामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रमवारीत थेट आठव्या स्थानावर घसरण झाली आहे.

बांगलादेशने कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करताच पाकिस्तान क्रमवारीत दोन क्रमांनी घसरला आहे. बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी संघ सहाव्या स्थानावर होता. पण निराशाजनक कामगिरीमुळे थेट आठव्या स्थानी घसरण झाली आहे.

पाकिस्तानला 1965 नंतर पहिल्यांदाच असा दिवस पाहण्याची वेळ आली आहे. 1965 नंतर पाकिस्तान संघ कधीच इतका रसातळाला गेला नव्हता. पण पाकिस्तानची खराब कामगिरी आणि दुबळ्या बांगलादेशने पराभूत केल्याने ही वेळ आली आहे. पाकिस्तानची स्थिती वेस्ट इंडिजपेक्षा वाईट झाली आहे.

पाकिस्तानचा संघ 76 रेटिंगसह आठव्या स्थानवर आहे. बांगलादेशच्या विजयामुळे श्रीलंका आणि वेस्ट इंडिजला फायदा झाला आहे. श्रीलंकेची एक क्रमाने बढती झाली असून सहाव्या स्थानावर, तर वेस्ट इंडिजला एका क्रमांकाचा फायदा झाला असून सातव्या स्थानावर आहे.

दोन सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात डाव घोषित करूनही पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की ओढावली. बांगलादेशने पाकिस्तानला 10 गडी राखून पराभूत केलं. तर दुसऱ्या सामना दुसऱ्या दिवशी सुरु झाला तरी बांग्लादेश विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. सहा गडी राखून पाकिस्तानला पराभूत केलं.

पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत पराभूत करणारा बांगलादेशचा संघ मात्र 66 रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 124 गुणांसह पहिल्या, तर भारतीय संघ 120 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.