
रणजीस्पर्धेद्वारे (Ranji Trophy) भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणारे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पूजारा (Cheteshwar pujara) पुन्हा एकदा फेल झाले. गुरुवारी दोघेही खूप स्वस्तात बाद झाले. सौराष्ट्राकडून खेळणारा चेतेश्वर पुजारा ओदिशा विरुद्ध आठ धावांवर बाद झाला. तर मुंबईकडून गोव्याविरुद्ध खेळताना अजिंक्य रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. तो शून्यावर बाद झाला.

पुजाराला मध्यमगती गोलंदाज देवव्रत प्रधानने बाद केलं. जो आतापर्यंत केवळ 12 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. तर दुसऱ्या बाजूला पुजाराकडे आतापर्यंत 200 पेक्षा जास्त फर्स्ट क्लास सामने खेळण्याचा अनुभव गाठीशी आहे. तरीदेखील या युवा गोलंदाजापुढे पुजाराचं काहीच चाललं नाही.

चेतेश्वर पुजारा अवघ्या सहा चेंडूंमध्ये बाद झाला. त्याने आठ धावांच्या खेळीत दोन चौकार लगावले. मुंबई विरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात पुजाराने पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात 91 धावा केल्या होत्या.

सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकी खेळी साकारली होती. पण आज फक्त तीन चेंडूत रहाणेचा खेळ संपला. मध्यमगती गोलंदाज लक्ष्य गर्गने त्याला पायचीत पकडलं. मुंबईच्या दोन बाद 30 झालेल्या असताना अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण लक्ष्य गर्गने त्याला लगेच पायचीत पकडलं. त्यामुळे मुंबईची अवस्था तीन बाद 30 झाली.

पुजारा आणि रहाणे या दोघांनाही श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत संधी दिलेली नाही. गेल्या वर्षभरात दोन्ही खेळाडूंची फलंदाजीची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. आता रणजीमध्येही रहाणे-पुजाराची बॅट शांत आहे जी त्यांच्यासाठी अजिबात चांगली गोष्ट नाही.