
आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी टीमची निवड करण्यासाठी 1 मे शेवटची तारीख आहे. त्यामुळे कुणाला संधी मिळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कप तिकीट मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील कामगिरी ही खेळाडूंसाठी निर्णायक ठरणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर काही खेळाडूंना संधी मिळू शकते. बीसीसीआय निवड समिती कोणत्या खेळाडूंना संधी देऊ शकते? टीम इंडियाचा वर्ल्ड कपसाठी संभावित संघ कसा असू शकतो? हे जाणून घेऊयात.

रोहित शर्मा टीम इंडियाचं वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांचं नाव निश्चित आहे. यशस्वी जयस्वाल रोहितसह ओपनिंग करु शकतो. मात्र ओपनर म्हणून शुबमन गिल याचं नावही आघाडीवर आहे. या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची? हा पेच निवड समितीसमोर असणार आहेत. फिनीशर म्हणून रिंकू सिंहला संधी मिळू शकते.

हार्दिक पंड्या टीम इंडियासाठी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो. मात्र सध्या त्याचे वाईट दिवस सुरु आहेत. आयपीएलमध्ये मुंबईची कॅप्टन्सी मिळाल्यापासून तो फ्लॉप ठरलाय. खरंतर हार्दिक टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं उपकर्णधारपद सांभाळणार आहे. मात्र आयपीएलच्या 17 व्या मोसमातील कामगिरीनंतर त्याला वगळण्यात यावं, अशीही मागणी करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचा ऑलराउंडर शिवम दुबे जबरदस्त कामगिरी करत आहे. शिवमने बॅटिंगसह बॉलिंगनेही आपली छाप सोडलीय. त्यामुळे शिवमने हार्दिकसमोर स्पर्धा निर्माण केली आहे. स्पिन ऑलराउंडर म्हणून अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या दोघांची नावं चर्चेत आहेत. अक्षरला आयपीएलमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

विकेटकीपर म्हणून कुणाची निवड करायची? याबाबत निवड समितीची कसोटी लागणार आहे. अपघातानंतर ऋषभ पंतने जोरदार कमबॅक केलंय. तसेच केएल राहुल, ईशान किशन, संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या चौघांची नावंही चर्चेत आहेत.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह या 3 वेगवान गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय मुकेश कुमार आणि मयंक यादव या दोघांचीही नावं चर्चेत आहेत. तर स्पिनर म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोघांचा समावेश केला जाऊ शकतो.

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल/शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, रिंकू सिंह, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह. राखीव : रवी बिश्नोई आणि मयंक यादव. हे खेळाडूही शर्यतीत : ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, केएल राहुल, मुकेश कुमार, रियान पराग, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल.