
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अवघ्या काही तासांनी सुरु होणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान होणार असून दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.

लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात हा सामना रंगणार असून टीम इंडियाचे खेळाडू लंडनमधील अरुंडेल कॅसल क्रिकेकट क्लबमध्ये सराव करत आहेत. या सरावाच्या माध्यमातून वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जून दरम्यान म्हणजेच पाच दिवस चालणार आहे. पण हा सामना ड्रॉ झाला तर विजेता कोणाला घोषित केलं असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल आहे. सामना अनिर्णित राहिला तरी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला जेतेपद मिळणार नाही.

आयसीसीच्या नियमांनुसार, जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे संयुक्त विजेते घोषित केले जाईल.

अंतिम फेरीत पावसामुळे व्यत्यय आल्यास पावसाची भरपाई करण्यासाठी एक राखीव दिवस आहे. पण असं असलं तरी यासाठीही एक नियम आहे. प्रत्येक कसोटीचा कालावधी 30 तासांचा असतो. म्हणजे दिवसाचे सहा तास किंवा दिवसाला 90 षटके असं गणित असतं. निर्धारित सहा तास पूर्ण झाले नाहीत किंवा दिवसाला 90 षटकांचा पूर्ण कोटा पूर्ण झाला नाही तरच राखीव दिवस लागू होतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स टेलिव्हिजनवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. डिस्ने प्लस हॉट स्टार मोबाईल ऍप्लिकेशनवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.