
भारताने इंग्लंडला चौथ्या कसोटी सामन्यात पराभूत करत मालिका आपल्या खिशात घातली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेत विजय मिळवला आहे. त्यामुळे पाचवा सामना जरी औपचारिकता असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आता पाचवा कसोटी सामना जिंकत अव्वल स्थानी विराजमान होण्याचा मानस आहे. कारण टॉप दोन संघांनाच अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे आता प्रत्येक सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे.

पाचव्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करू शकतात. त्यामुळे आतापर्यंत सुमार कामगिरी असलेल्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची शक्यता आहे.

रजत पाटीदारचं कसोटी मालिकेतील कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात देवदत्त पडिक्कल याला संधी मिळू शकते. पडिकल्लही कसोटीत पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे.

रजत पाटीदारने आतापर्यंत 5 सामन्यात केवळ 63 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 12.6 आहे. पाटीदारची ही कामगिरी त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जवळपासही नाही.

रजत पाटीदारने 57 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 97 डावांमध्ये 44.46 च्या सरासरीने 4046 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याचा सध्याचा फॉर्म अतिशय चिंताजनक आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.