
18 महिन्यांपासून कसोटी संघातून लांब असलेल्या अजिंक्य रहाणेची बॅट आयपीएलमध्ये चांगलीच तळपली. त्यात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या दुखापतीमुळे त्याला पुन्हा कसोटी संघात स्थान मिळालं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याने साजेशी कामगिरी केली आणि त्याला विंडीज दौऱ्यात उपकर्णधारपद मिळालं. पण अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो सुरु झाला आहे.

अजिंक्य रहाणे याने जवळपास एक दशक मधल्या फळीत टीम इंडियाला भक्कम साथ दिली. मात्र मधल्या काळात फॉर्म गेल्याने त्याला संघातून डावलण्यात आलं होतं. मात्र त्याने संघात पुनरागमन केलं तसेच त्याला उपकर्णधारपदही मिळालं.

अजिंक्य रहाणे याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पहिल्या डावात 89 आणि दुसऱ्या डावात 46 धावांची खेळी केली होती.

रहाणेचा आयपीएलमधील वेगवान खेळ आणि कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील कामगिरीमुळे त्याच्याकडून वेस्ट इंडिजमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित होती. पण दुर्दैवाने रहाणे या मालिकेत चमकू शकला नाही. पहिल्या कसोटीत फक्त दोन धावा करून तंबूत परतला.

दुसऱ्या कसोटीतही रहाणे केवळ 8 धावा करून बाद झाला. आता रहाणेला कसोटी संघात टिकायचे असेल तर त्याला दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी करावी लागेल. जर तसं झालं नाही तर त्याची कारकिर्द संपुष्टात येईल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

वेस्ट इंडिज मालिकेनंतर पुढची कसोटी मालिका पाच महिन्यानंतर आहे. आशिया कप आणि वनडे संघात रहाणेला स्थान मिळणं अशक्य आहे. त्यामुळे तो मुश्ताक अली T20 ट्रॉफी किंवा विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना दिसू शकतो.

बीसीसीआयने अजित आगरकर याच्याकडे निवड समितीचं अध्यक्षपद सोपवलं आहे. त्याच्यावर नवीन खेळाडूंना संधी देण्याचीही जबाबदारी असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या डावातील अपयशानंतर रहाणेला पुन्हा संधी मिळण्याची आशा कमी आहे.