
भारताचा नंबर 1 टेनिसपटू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. टेनिसपटू सुमित नागल याने 2019 मध्ये युएस ओपनमध्ये रॉजर फेडररला एका सेटने पराभूत केलं होतं. यामुळे सुमित नागल चर्चेत आला होता.

सुमित नागल आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलाआहे. सध्या सुमितचं एटीपी रँकिंग 159 आणि देशातील नंबर 1 टेनिसपटू आहे.

सुमित नागलने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, आता माझ्या खात्यात फक्त 80 हजार रुपये आहेत. ट्रेनिंगसाठी ही रक्कम खूपच कमी आहे.

सुमितने सांगितलं की, प्रशिक्षणासाठी वार्षिक खर्च 80 लाख ते एक कोटींच्या घरात आहे. हा फक्त प्रशिक्षणाचा खर्च असून यात फिजिओची फी नाही. फिजिओला पैसेच देऊ शकत नसल्याचं त्याने सांगितलं.

सुमितने सांगितलं की, 'प्रशिक्षणासाठी मी सर्वस्व लावलं आहे. बक्षिसाची रक्कम, इंडियन ऑईलकडून मिळणारा पगार सर्वकाही दिलं आहे. खेळसाठी मी हे सर्व करत आहे, पण आता पैसा नाही. सर्वात मोठी अडचण प्रायोजक नसल्याने होत आहे. त्यामुळे आर्थिक गणित सुटत नाही.'

"भारताचे माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मन आणि ख्रिस्तोफर मार्कियोस यांनी माझी मदत केली. त्यांच्यामुळे मी माझं प्रशिक्षक पुढे चालू ठेवलं आहे.", असंही सुमितने पुढे सांगितलं.