
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचं आयोजन 2017 नंतर पहिल्यांदा करण्यात येत आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियाची या स्पर्धेच्या इतिहासातील कामगिरी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Harry Trump-ICC/ICC via Getty Images)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 1998 साली पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच झटक्यात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तर टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं होतं. भारताने मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. (Photo Credit : AFP)

त्यानंतर 2000 साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. न्यूझीलंडने टीम इंडियावर अंतिम सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता. (Photo Credit : Icc X Account)

सौरव गांगुली याने टीम इंडियाचं 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत नेतृत्व केलं. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. मात्र पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात आलं. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाचं 2004 चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं. वेस्ट इंडीजने ही ट्रॉफी उंचावली. तसेच 2006 सालीही टीम इंडियाचा साखळी फेरीतच बाजार उठला होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ठरली होती. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडिया 2009 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात या स्पर्धेत उतरली. मात्र टीम इंडिया पुन्हा एकदा साखळी फेरीतच ढेर झाली. मात्र टीम इंडियाने 2013 साली सर्व भरपाई केली. टीम इंडियाने 2013 साली धोनीच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. (Photo Credit : Icc X Account)

अखेरीस 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाही टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक दिली. मात्र कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताला पराभूत केलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडिया अशाप्रकारे या स्पर्धेत एकूण 2 वेळा उपविजेता राहिली आहे. एकदा संयुक्तरित्या विजेता राहिली आहे. तर एकदा ही ट्रॉफी जिंकली आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत 2017 साली अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडिया यंदा या पराभवाचा घेणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : Icc X Account)