IPL 2026: आयपीएल स्पर्धेच्या या पर्वात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारे पाच गोलंदाज, तीन भारतीयांचा समावेश
आयपीएल 2026 स्पर्धेत 49 सामन्यांचा खेळ संपला असून अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. खरं तर आयपीएल स्पर्धा ही फलंदाजांची आहे. पण काही गोलंदाजांनी या पर्वात छाप सोडली आहे. सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा पराक्रम केला आहे. चला जाणून घेऊयात पाच गोलंदाजांबाबत...

आयपीएल 2026 स्पर्धेत अनेक विक्रम रचले आणि मोडले गेले. या पर्वात 265 धावांचं लक्ष्य असो की अवघ्या 36 चेंडूत शतकी खेळी असे विक्रम नोंदवले गेलेत. इतकंच काय तर उर्वरित सामन्यातही काही विक्रम रचले जाणार यात काही शंका नाही. असं असताना या स्पर्धेत काही गोलंदाजांनी निर्धाव चेंडू टाकून आपली छाप सोडली आहे. चला जाणून घेऊयात पाच गोलंदाजांबाबत.. (Photo: IPL/BCCI)

गुजरात टायटन्सकडून खेळणारा मोहम्मद सिराज निर्धाव चेंडू टाकण्यात अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 37 षटके (222 चेंडू) गोलंदाजी केली आहे. यापैकी 109 चेंडू निर्धाव टाकले. म्हणजेच त्याने टाकलेल्या गोलंदाजीच्या निम्म्या चेंडूंवर फलंदाजांना एकही धाव काढता आलेली नाही. आतापर्यंत 11 बळी घेऊन सिराज संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. (Photo: IPL/BCCI)

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्सकडून खेळत असून जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 37 षटकांत 107 निर्धाव चेंडू टाकले आहेत. यासह जोफ्रा आर्चर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या वेगामुळे फलंदाजांना चेंडू खेळणं कठीण जात आहे. आर्चरने आतापर्यंत 15 बळी घेतले असून पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. (Photo: IPL/BCCI)

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा गुजरात टायटन्सच्या गोलंदाजी विभागाचा कणा राहिला आहे. आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 39 षटके टाकली असून 105 निर्धाव चेंडूंसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 100 पेक्षा जास्त निर्धाव चेंडू टाकणाऱ्या तीन गोलंदाजांपैकी एक आहे. रबाडाने आतापर्यंत 16 बळी घेतले आहेत. (Photo: IPL/BCCI)

लखनौ सुपरजायंट्सला अडचणींचा सामना करावा लागत असला तरी, मोहम्मद शमी आपल्या भेदक गोलंदाजीने प्रभावित करत आहे. आतापर्यंत फक्त 9 सामने खेळलेल्या शमीने 35 षटकांत 95 निर्धाव चेंडू टाकले आहेत. कमी सामने खेळूनही अव्वल 4 खेळाडूंमध्ये आहे. त्याने आतापर्यंत 8 बळी घेतले आहेत. (Photo: IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सचा युवा खेळाडू अंशुल कंबोज या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 35.4 षटकांत 94 निर्धाव चेंडू टाकले आहेत. विशेष म्हणजे, या हंगामात सर्वाधिक 17 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अंशुल भुवनेश्वर कुमारसोबत संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे. (Photo: IPL/BCCI)