
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम 18 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद इथे खेळवण्यात येणार आहे. प्लेऑफच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. मात्र त्याआधी आरसीबीच्या सर्व खेळाडूंनी लोकल बॉय मोहम्मद सिराज याच्या घरी भेट दिली. सिराजने आपल्या सहकाऱ्यांना नव्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानिमित्ताने हा योग जुळून आला. यावेळेस सिराजच्या सहकाऱ्यांनी हैदराबादी बिर्याणीवर आडवा हात मारला.

आरसीबीचा माजी कर्णधार आणि स्टार बॅट्समन विराट कोहली याने सिराजच्या कुटुंबियांसोबत फोटो काढला. आतापर्यंत आपण ज्यांना टीव्हीवर खेळताना पाहिलं ते सर्व दिग्गज क्रिकेटर आपल्या घरी आल्याने सिराज कुटुंबिय भारावून गेले होते.

सिराजच्या घरी विराटसह कोच संजय बांगर, कॅप्टन फाफ डु प्लेसिस, वेन पार्नेल, केदार जाधव आणि जवळपास सर्वच खेळाडूंनी भेट दिली. यावेळेस बऱ्याच खेळाडूंनी हैदराबादी बिर्याणीवर आडवा हात मारला. आरसीबीच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

सिराजचं नवं घर अगदी प्रशस्त असं आहे. सिराजच्या या घरात आरसीबीचे सहकारी मजा करताना दिसत आहे. आयपीएल स्पर्धेच्या धावपळीत या खेळाडूंनी काही क्षण सहकाऱ्याची घरी आनंदाने घालवले.

नव्या घरातील एका भागात सिराजने जिंकलेल्या ट्रॉफी ठेवलेल्या दिसून येत आहेत. तसेच सिराजने घरात विराट कोहली याच्यासोबतचा फोटो आणि बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या ऐतिहासिक क्षणाचा फोटो फ्रेम करुन ठेवला आहे.

सिराज एका फोटोत अनुज रावत याला आपलं घर दाखवताना दिसतोय. रावतने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात नाबाद 29 धावांची खेळी करत फिनीशिंग टच दिला होता.

दरम्यान मोहम्मद सिराज याने आयपीएल 16 व्या मोसमात आरसीबीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सिराजने 12 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजची 21 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. सिराजकडून हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात होम ग्राउंडमध्ये अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.