
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्याच्या निकालामुळे उपांत्य फेरीच्या समीकरणावर काही परिणाम होणार नाही. पण उपांत्य फेरीत कोण कोणासोबत लढणार हे स्पष्ट होईल.

भारताने नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करावी लागली. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करताना टीम इंडियाने आघाडीचे फलंदाज झटपट गमावले. यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दिग्गज फलंदाज आहेत. पण श्रेयस अय्यरने अक्षर पटेलसह मधल्या फळीत डाव सावरला.

श्रेयस अय्यरने 75 चेंडूत 50 धावा ठोकल्या. यावेळी त्याने 4 चौकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट हा 66.67 चा होता. खरं तर श्रेयस अय्यरच्या वनडे कारकिर्दितील सर्वात धीम्या गतीने ठोकलेलं अर्धशतक आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध 2022 मध्ये 74 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्यात 98 धावांची भागीदारी झाली. या जोडीमुळे टीम इंडियाला 30 धावांवरून 128 धावांपर्यंत मजल मारता आली. अक्षर पटेल 61 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारून 42 धावांवर बाद झाला.

गेल्या काही वर्षात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची चिंता टीम इंडियाला होती. पण ही कसर श्रेयस अय्यरने भरून काढली आहे. टॉप ऑर्डर फेल गेल्यानंतर त्याने अनेकदा डाव सावरला आहे. श्रेयस अय्यर वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंचाही तितक्याच ताकदीने सामना करतो.