
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील दुसरा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या आणि 181 धावांचं लक्ष ठेवलं. हे आव्हान इंग्लंडने 17.3 षटकात दोन गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात फिल सॉल्टने जबरदस्त कामगिरी केली आणि माजी क्रिकेटपटू इयॉन मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला.

वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या 181 धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्टने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या षटकापासूनच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्यामुळे इंग्लंडचा विजय सोपा होत गेला.

फिल सॉल्टने या सामन्यात 47 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 87 धावा केल्या. यात फिल सॉल्टने 5 उत्तुंग षटकार आणि 7 चौकार मारले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडला विजय मिळवता आला.

फिल सॉल्टने पाच षटकार मारून इंग्लंडसाठी टी20 क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम यापूर्वी इयॉन मॉर्गनच्या नावावर होता.

इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने न्यूझीलंडविरुद्ध एकूण 26 षटकार मारत विक्रम केला होता. पण हा विक्रम आता फिल सॉल्टच्या नावावर झाला आहे. पाच षटकार मारत त्याने या विक्रमाची रेषा ओलांडली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध फिल सॉल्ट आतापर्यंत एकूण 9 डाव खेळला आहे. यात त्याने एकूण 32 षटकार मारले आहे. इयॉन मॉर्गनपेक्षा 6 षटकार अधिक आहेत. त्यामुळे एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.