
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटचं सुवर्णपदक 100 ग्रॅम वाढीव वजनामुळे हुकलं होतं. त्यामुळे जगभरात चर्चा रंगली होती. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक गमावल्यानंतर हताश झालेल्या विनेश फोगाटने कुस्तीला रामराम ठोकला होता. आता विनेशने सरकारी नोकरीचाही राजीनामा दिला आहे.

उत्तर रेल्वेमध्ये ओएसडी म्हणून कार्यरत असलेल्या विनेशने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करून राजीनामा जाहीर केला. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे ही नोकरी सोडत असल्याचे तिने सांगितलं आहे.

विनेशने राजीनामा पत्रात लिहिले की, 'भारतीय रेल्वेची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर, मी रेल्वे सेवा सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशाच्या सेवेत रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन.'

उत्तर रेल्वेमध्ये ओएसडी म्हणून कार्यरत असलेल्या विनेश फोगटला चांगला पगार होता. या पदावर असताना विनेश फोगट यांचा मासिक पगार लाखांच्या घरात होता.

सरकारी नोकरीचा राजीनामा दिलेली विनेश निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या चर्चेनंतर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत.

हरियाणातील 90 विधानसभा मतदारसंघांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने विनेश फोगाटला तिकीट दिलं तर आश्चर्य वाटायला नको.