
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकून अंतिम फेरीसाठी भारतीय संघ पात्र ठरला. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामना होणार आहे.

अंतिम फेरीसाठी टीम इंडिया आधीच लंडनला पोहोचली आहे. तिसर्या बॅचमध्ये अजिंक्य रहाणेसह केएस भारत, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा आयपीएल 2023 च्या फायनलनंतर लंडनला पोहोचले आहेत.

आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने 14 सामन्यात 172.49 च्या स्ट्राइक रेटने 326 धावा केल्या. याच अप्रतिम कामगिरीमुळे रहाणेला पुन्हा टीम इंडियात संधी मिळाली आहे.

अजिंक्य रहाणे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघात परतला असून आता रहाणेला अनेक विक्रम रचण्याची संधी मिळाली आहे.

अजिंक्य रहाणेने भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 4931 धावा केल्या आहेत आणि आणखी 69 धावा केल्यास कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण करेल. रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके आणि 25 अर्धशतकेही झळकावली आहेत.

टीम इंडियाच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रहाणेने आतापर्यंत खेळलेल्या 82 सामन्यांमध्ये 99 झेल घेतले आहेत. जर त्याने आणखी एक झेल घेतला तर त्याचे100 झेल पूर्ण करेल.

अजिंक्य रहाणेने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12,865 धावा केल्या आहेत. आणखी 135 धावा केल्यास तो 13,000 धावा पूर्ण करेल.