
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात त्यांच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री नविका कोटिया आता 25 वर्षांची झाली आहे. नविकाचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

रिअल इस्टेट डेव्हलपर माजेन मोदी याच्याशी नविकाचं लग्न ठरलं आहे. कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांचा गुड धानाचा (गुजराती विवाहपद्धतीनुसार) विधी पार पडला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नविकाने तिच्या लग्नाविषयी सांगितलं आहे.

"नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आमचा साखरपुडा होणार आहे. जैन समुदायात लग्न ठरल्यानंतर एक विशेष विधी केली जाते, ते आम्ही नुकतंच पूर्ण केलं. दोन आठवड्यांपूर्वीच हे सर्व ठरवण्यात आलं होतं. अखेरच्या क्षणी आम्ही घाईघाईत सर्व तयारी केली", असं ती म्हणाली.

"गुड धानाच्या विधीला फक्त कुटुंबीयच उपस्थित होते. माजेनच्या पुण्यातल्या घरात ही विधी करण्यात आली होती. जानेवारी 2026 मध्ये आम्ही साखरपुडा करणार आहोत. लग्नाची तारीख मात्र अद्याप ठरवण्यात आली नाही. कदाचित एक-दोन वर्षांनी लग्न करू", असं तिने पुढे सांगितलं.

नविकाचं हे अरेंज मॅरेज असून एका कॉमन मित्राच्या माध्यमातून तिची माजेनशी भेट झाली होती. जवळपास वर्षभराच्या मैत्रीनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. यावर्षी दिवाळीत माजेनने नविकाच्या आईवडिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला होता.

"मला अरेंज मॅरेजच करायचं होतं, त्यामुळे मी खुश आहे. पण सर्वकाही इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा केली नव्हती. त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार आणि प्रेमळ कुटुंब मला कुठे मिळूच शकत नाही. त्यामुळे मी स्वत:ला खूप नशिबवान समजते", असं म्हणत आयुष्यातील या नवीन सुरुवातीसाठी उत्सुक असल्याची भावना तिने व्यक्त केली.