
बॉलिवूडचे महान अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबरला मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 90 व्या वाढदिवसाला काही दिवस उरले असताना धर्मेंद्र यांचं निधन झालं. 300 हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

12 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण 24 नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांची दोन लग्न झाली होती. त्यांना एकूण सहा मुलं आहेत. पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी हेमा मालिनी.

आज 3 डिसेंबर धर्मेंद्र यांच्या अस्थी वसर्जनासाठी देओल कुटुंब उत्तराखंड हरिद्वार येथे हर की पौरी गंगा घाटावर आलेलं. सनी देओल, बॉबी देओलसह काही नातेवाईक तिथे उपस्थित होते. वेदिक मंत्रोच्चारात पुजाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली विधी सुरु होते.

अत्यंत खासगी असं या छोटेखानी कार्यक्रमाच स्वरुप होतं. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला. कुटुंबिय आदल्यादिवशीच येथे दाखल झालेले. खासगी घाटावर धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाचा विधी सुरु होता.

काही पापाराझी कॅमेरामन्स गुप्तपणे धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाच्या विधींच चित्रीकरण करत होते.सनी देओलने ते पाहिल्यानंतर तो संतापला. कॅमेरा जप्त करण्यासाठी तो पापाराझींच्या दिशेने गेला. पैसा पाहिजे? किती पैसे पाहिजे तुला? असं संतापाने तो बोलला. सनी देओलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.