
सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. दरम्यान तिचा उत्तर प्रदेशमधील मथुरेत होणारा न्यू ईअर पार्टीचा कार्यक्रम वादात सापडला आहे. तिच्या या कार्यक्रमाला तेथील संतांकडून विरोध केला जात आहे.

मथुरेतील संतांनी एकत्र येत तेथील जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात सनी लिओनीचा न्यू ईअर पार्टीचा कार्यक्रम रद्द करावा तसेच आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे सनी लिओनी मात्र सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा जोमात प्रचार करत आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन ती करत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदीर खटल्यातील प्रमुख याचिकाकर्ते दिनेश फलाहारी यांनीच मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिले आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मथुरेतील हॉटेल ललिता ग्राऊंड आणि हॉटल दा ट्रक या दोन हॉटेलमध्ये सनी लिओनीचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात अश्लीलतेचे प्रदर्शन होणार आहे, असा दावा फलाहारी यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मथुरा या पवित्र नगरीला कलंकित केले जात आहे, असा दावा फलाहारी बाबा यांनी केले आहे.

सनी लिओनीच्या या कार्यक्रमाला मथुरेत विरोध होत असला तरी सनी लिओनी मात्र या कार्यक्रमाचा प्रचार करत आहे. त्यामुळे सनी लिओनीच्या या कार्यक्रमात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.