
मनोरंजन क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार केवळ अभिनयापुरतेच स्वतःला मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करताना दिसत आहेत.

मराठी इंडस्ट्रीतील तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, रेश्मा शिंदे, मृणाल दुसानीस यांसारख्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी अभिनयासोबतच उद्योजकतेच्या क्षेत्रात यशस्वी पावलं टाकली आहेत.

ज्यामध्ये काही कलाकार अभिनयासोबतच व्यवसाय, स्टार्टअप, फॅशन, ब्युटी आणि इतर क्षेत्रांत कलाकार आपलं नशीब आजमावत आहेत. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं आहे ते म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे.

स्वानंदी बेर्डेने नुकतंच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. विशेष म्हणजे या ब्रँडच्या नावामागे तिची भावनिक नाळ जोडलेली आहे. स्वानंदीच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव ‘कांतप्रिया’ असं आहे.

वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावातील ‘कांत’ आणि आई प्रिया बेर्डे यांच्या नावातील ‘प्रिया’ हे दोन्ही शब्द एकत्र करून तिने आपल्या ब्रँडला हे अनोखं आणि अर्थपूर्ण नाव दिलं आहे.