8 वर्षे बेरोजगार, आर्थिक तंगी.. ‘तारक मेहता..’ने असं बदललं ‘अब्दुल’चं आयुष्य
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारून अभिनेता शरद संकला घराघरात पोहोचला. या मालिकेनं त्याचं नशिब पालटलं. त्यापूर्वी तो जवळपास आठ वर्षे बेरोजगार होता. एका मुलाखतीत तो त्याच्या संघर्षाविषयी व्यक्त झाला.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या अत्यंत लोकप्रिय मालिकेनं अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली आहे. अभिनेता शरक संकला त्यापैकीच एक आहे. या मालिकेत त्याने अब्दुलची भूमिका साकारली आहे. आज लोक शरदला त्याच्या खऱ्या नावापेक्षा अब्दुल याच नावाने जास्त ओळखतात. मात्र ही प्रसिद्धी त्याला सहज मिळाली नाही.

शरदला त्याच्या करिअरमध्ये सुरुवातीला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. चार्ली चॅप्लिनची हुबेहूब नक्कल केल्यामुळे तो सुरुवातीला इंडस्ट्रीत 'चार्ली' या नावाने ओळखला जात होता. त्याने शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबतही काम केलं आहे. इतक्या मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम करूनही शरद एकेकाळी बेरोजगार होता.

'आवारा मुसाफिर' या पॉडकास्टमध्ये शरक त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. तो म्हणाला, "तारक मेहताचे निर्माते असितकुमार मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. माझ्या करिअरमधील सुरुवातीच्या शोजपैकी एक असलेल्या 'हम सब एक है'ची निर्मिती त्यांच्या 'नीला टेलिफिल्म्स' या प्रॉडक्शन कंपनीचीच होती. त्या शोचा पहिला शॉट माझ्यासोबत घेण्यात आला होता, कारण असित भाई मला 'लकी' मानतात."

"जेव्हा तारक मेहता ही मालिका सुरू झाली, तेव्हा जवळपास सात ते आठ वर्षे माझ्याकडे काम नव्हतं. तो खूप कठीण काळ होता. 2001 ते 2007 पर्यंत मी खूप कमी काम केलं. त्यानंतर मला काहीच काम नव्हतं. कारण लोक आपापल्या लोकांना काम देत असत. मला कळलं की असित मोदी हे एक मोठा शो करण्याचा विचार करत आहेत. माझा कॉलेजमधील मित्र राज प्रेमी याने असित भाईंना माझं नाव सुचवलं होतं. त्यावेळी मी बेरोजगार होतो", असं त्याने पुढे सांगितलं.

त्यावेळी कोणतीही ऑडिशनची प्रक्रिया नव्हती. असित मोदींनी थेट शरदला फोन केला आणि मालिकेची संकल्पना समजावून सांगितली. ते म्हणाले की, शोमध्ये विविध समाजातील पात्रे असतील, पण त्यात एक मुस्लीम पात्रसुद्धा असेल. "त्यांनी मला एका साध्याभोळ्या अब्दुल नावाच्या सोडा दुकानदाराची भूमिका दिली," असं शरद म्हणाला.

शरद संकलाच्या हाती त्यावेळी काहीच काम नव्हतं आणि असित मोदींना नाही कोण म्हणणार म्हणून त्याने होकार दिला. तोच निर्णय सर्वोत्तम ठरल्याचं शरद सांगतो. "तारक मेहतामधील अब्दुल या भूमिकेमुळे मला ओळखलं जातं, याचा खूप आनंद आहे. माझे कुटुंबीय आणि नातेवाईक मला शरद संकला म्हणून ओळखतात आणि तेवढंच पुरेसं आहे. आपल्या कामाचा लोकांवर इतका खोलवर परिणाम होतो, ही अभिमानाची गोष्ट आहे", अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

याविषयी शरद पुढे म्हणाला, "आजही जेव्हा कोणी येऊन 'अब्दुल मिया, कसे आहात', असं विचारतं, तेव्ही मी त्यांना सलाम करतो. जरी त्यांना माझं खरं नाव माहीत नसलं आणि ते मला केवळ माझ्या भूमिकेमुळे ओळखत असले तरी मी आदराने आणि कृतज्ञतेने त्यांचं स्वागत करतो. माझ्या कठीण काळातून मी हेच शिकलो की, तुम्ही जसे आहात तसंच राहा, काळ नक्की बदलेल."