
यात काही शंका नाही की मोबाईल आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आज लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. विशेष म्हणजे, आपण काही मिनिटांसाठीही मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. अगदी टॉयलेटला जातानाही मोबाईल सोबत घेऊन जातो आणि तिथे बसून त्याचा वापर करतो, जेणेकरून वेळ जाईल. पण हा वेळ घालवण्याचा प्रयत्न तुम्हाला आजारी पाडू शकतो. जीवघेण्या आजाराला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.

एक वेबसाइटशी बोलताना ब्रिटनच्या डॉ. सारा जर्विस यांनी सांगितले की, तुम्ही किती वेळ फोन घेऊन कमोडवर बसता, यामुळे हेमरॉइड्स म्हणजेच मूळव्याध होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. तुम्ही जितका जास्त वेळ टॉयलेटमध्ये फोन वापराल, तितका जास्त वेळ कमोडवर बसाल. त्यामुळे गुदद्वार आणि खालच्या गुदाशयाच्या स्नायू व नसांवर दबाव वाढतो. याचमुळे मूळव्याधाचा धोका वाढतो.

आतापर्यंत बद्धकोष्ठता किंवा शौचासाठी जोर लावल्याने मूळव्याधीसारख्या तक्रारी होत होत्या. याशिवाय गरोदर महिलांना, सतत खोकला किंवा कफ असणाऱ्यांना आणि वृद्धांमध्येही मूळव्याधीची समस्या जास्त दिसून येत होती. पण गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, जे लोक कमोडवर बसून मोबाईलचा जास्त वापर करतात, त्यांनाही मूळव्याधीची तक्रार होत आहे.

जर तुम्ही नेहमी मोबाईल फोन वापरत असाल आणि टॉयलेटमध्येही तो सोबत घेऊन जात असाल, तर लक्षात ठेवा की यामुळे तुमच्या आरोग्याला खूप नुकसान होत आहे. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुम्ही बाथरूममधून अनेक जंतू मोबाईलवर घेऊन बाहेर येता. त्यामुळे तुम्हाला अतिसार, आतड्यांचे आजार आणि मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. शिवाय, हे जंतू इतरांनाही संसर्गित करू शकतात.

टॉयलेटमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसू नये, पण हातात फोन असल्याने हा वेळ 20-30 मिनिटांपर्यंत वाढू शकतो, ज्यामुळे शौच प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)