
दात हे केवळ आपल्या सौंदर्यात भर घालत नाहीत, तर सामुद्रिक शास्त्रानुसार ते आपल्या व्यक्तिमत्वही उलगडतात. प्रत्येक व्यक्तीच्या दातांची ठेवण वेगळी असते. काही लोकांचे दात सरळ, काहींचे वाकडे, तर काहींच्या दातांमध्ये अंतर असते.

दातांच्या या विविध आकारानुसार व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्यांना भविष्यात काही अडचणी येऊ शकतात का, त्यांचे नशिब काय सांगते, याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले आहे की, ज्या लोकांच्या दातांमध्ये अंतर असते, ते खूप भाग्यशाली असतात. अशा व्यक्ती हाती घेतलेल्या कोणत्याही कामात हमखास यश मिळवतात. ते आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न असतात.

दातांमध्ये अंतर असलेल्या व्यक्ती स्वभावाने हुशार असतात. ते आपले काम चतुराईने करून घेतात. पैशांची बचत करण्याच्या बाबतीतही ते पुढे असतात, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या फारच सक्षम असतात. काही वेळा ते इतरांच्या पैशांचाही उपयोग घेतात असे म्हटले जाते.

ज्या लोकांचे दात शुभ्र पांढरे असतात, ते खूप भावनिक स्वभावाचे असतात. असे लोक कोणावरही सहज विश्वास ठेवतात. ते खूप विचार करतात. त्यांना कोणी काही बोलल्यास ते त्यावर तासनतास चिंतन करतात. अनेकदा याच स्वभावामुळे त्यांना फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो.

ज्या लोकांचे दात सरळ आणि सुव्यवस्थित असतात, ते आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात. अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असते आणि त्यांचा स्वभाव सौम्य असतो. त्यांना कोणत्याही कामात तसेच व्यवसायात चांगले यश मिळते. नवनवीन कल्पनांचा वापर करून ते व्यवसायात यशस्वी होतात. तसेच भरपूर पैसा कमावतात.

ज्या लोकांचे समोरचे वरचे दोन दात इतरांपेक्षा थोडे लांब असतात, त्यांची बुद्धी खूप तीक्ष्ण असते. ते तीव्र बुद्धिमत्तेने संपन्न असतात. मात्र, त्यांना कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. या लोकांना सहज यश मिळत नाही.

ज्या लोकांचे समोरचे वरचे दोन दात थोडे लांब असतात असे लोक स्पष्टवक्ते असतात. अशा लोकांचे सल्ले खूप महत्त्वाचे असतात. ते जे काही बोलतात, ते कधी ना कधी खरं ठरतं. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची सत्यता असते.

ज्या लोकांचे दात एक मागे एक असतात म्हणजे समोर दोन दात किंवा मागे दोन दात अशा व्यक्तींना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. अगदी लहान कामातही यश मिळवण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.

दातांवर दात असणाऱ्या लोकांनी कधीही इतरांच्या सल्ल्याने काम करु नये. त्यांनी जे काही करायचे आहे, ते स्वतःच्या योजनेनुसार आणि मनानुसार करावे. लोकांच्या प्रभावाखाली येऊन वारंवार आपली योजना बदलू नये, अन्यथा काम यशस्वी होत नाही.

ज्या लोकांचे दात खडबडीत असतात, ते खूप दुर्दैवी मानले जातात. अशा व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. नशिबामुळे त्यांना वारंवार अपयश येते आणि ते जे काही काम करतात, ते सहज पूर्ण होत नाही.

ज्या लोकांचे दात व्यवस्थित ओळीत, एकसारखे आणि सुंदर हास्य असलेले असतात, ते अनेकदा काय करावे हे ठरवू शकत नाहीत. ते नेहमी गोंधळाच्या स्थितीत असतात आणि स्वतःशीच त्रस्त राहतात, इतरांशी नाही.