Vijay Family Tree: वडील दिग्दर्शक, आई गायिका, छोट्या बहिणीचं लहानपणीच निधन; थलपती विजयच्या कुटुंबात कोण कोण?
थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत दमदार पदार्पण केलं आहे. या विजयानंतर साऊथ सुपरस्टारविषयी अधिकाधिक जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विजयच्या कुटुंबात कोण कोण आहेत, ते जाणून घ्या..

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत साऊथ सुपरस्टार थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाचा दबदबा पहायला मिळाला. हा पक्ष सुरुवातीच्या कलांमध्ये शंभरहून अधिक जागांवर आघाडीवर आहे. थलपती विजयचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं असून त्याच्या कुटुंबात कोण कोण आहेत, ते जाणून घेऊयात..

विजयचा तमिळ सिनेसृष्टीत मोठा चाहतावर्ग आहे. 22 जून 1974 रोजी चेन्नईमध्ये त्याचा जन्म झाला. विजयचं कुटुंबसुद्धा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर प्रसिद्ध तमिळ चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक आहेत. विजयच्या सुरुवातीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्याच्या वडिलांनीच केलं होतं. विजयचे वडील ख्रिश्चन कुटुंबातील आहेत. त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर आधारित 70 हून अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

विजयची आई शोभा चंद्रशेखर या पार्श्वगायिका, संगीतकार आणि लेखिका आहेत. त्यांनी तमिळ चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. विजयची आई हिंदू कुटुंबातून असून त्याच्या आईवडिलांचं आंतरधर्मीय लग्न आहे. विजयला एक छोटी बहीणसुद्धा होती, जिचं नाव विद्या चंद्रशेखर होतं. दुर्दैवाने वयाच्या दुसऱ्याच वर्षी तिचं निधन झालं.

विजयच्या पूर्व पत्नीचं नाव संगीता सोरनलिंगम आहे. संगीता ही मूळची श्रीलंकेतील तमिळ आहे. ती लंडनमध्ये राहत होती. विजयची ती खूप मोठी चाहती होती. या दोघांची भेट लंडनमध्येच झाली होती. 25 ऑगस्ट 1999 रोजी या दोघांनी लग्न केलं. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न झालं होतं. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून विजय आणि संगीताच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

विजय आणि संगीता यांना दोन मुलं आहेत. विजयच्या मुलाचं नाव जेसन संजय असून त्याचा जन्म 26 ऑगस्ट 2000 रोजी झाला. जेसनने विजयच्या काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकासुद्धा साकारल्या आहेत. तर त्याच्या मुलीचं नाव दिव्या साथा असून तिचा जन्म 2005 मध्ये झाला.