
सातारा-सोलापूर रस्त्यावर धुळदेव गावाजवळ एक एसटी बस रस्त्यावरच जळून खाक झाली आहे. चालकाच्या प्रसंगावनधानमुळे मोठा अनर्थ टळलाय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटी बसमधील प्रवासी बालंबाल बचावले आहेत.

चालकानं आग लागल्याचं ध्यानात येताच लगेचच प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. भररस्त्यामध्येच आगीच्या भक्ष्यस्थानी एसटी बस आली होती. बघता बघता एसटी बसचा कोळसा झालाय.

माण तालुक्यातल्या म्हसवड जवळच्या धुळदेव इथं ही घटना घडली. यातून बचवलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तर चालकानंही प्रतिक्रिया देताना भराभर प्रवासांना एसटीतून खाली उतरवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असल्याचं म्हटलंय.

इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिणगी उडाली आणि बघता बघता एसटी बसनं पेट घेतला होता. भररस्त्यात एसटीतून निघत असलेल्या आगीच्या ज्वाळा पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली.

आग लागल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. यानंतर दूरवरुन काही प्रवाशांनी एसटी बस पेट घेतलेल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईन कॅमऱ्यामध्ये कैद केलाय. थोडक्यात एसटीमधील प्रवाशांचे प्राण वाचलेत. दरम्यान, काही वेळानंतरत अग्निशमन दलाचीही गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत ही एसटी पूर्ण जळून खाक झाली होती.