
दातांमध्ये वेदना होण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र काही वेळेस हे दुखणं एवढं वाढतं की सहन करणंही कठीण होतं. दाताला सूज येणे, दात किडणे अशा अनेक गोष्टींमुळे दातांत वेदना होतात. अशावेळी काही घरगुती उपायांनी त्या वेदना कमी होऊन आराम मिळू शकतो.

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या - दातातील वेदना कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे तोंडातील व्रण आणि सूजही कमी होते. एक ग्लास गरम पाण्यात थोडं मीठ घालून ते तोंडात घेऊन गुळण्या कराव्यात.

पेपरमिंट टी बॅग - दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी पेपरमिंट टी बॅग फायदेशीर ठरू शकते. दातदुखीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यासाठी पेपरमिंट खूप उपयुक्त आहे. पेपरमिंट टी बॅग फ्रीजमध्ये ठेवून गार झाल्यावर वेदना होणाऱ्या भागावर ठेवा. त्याने आराम मिळेल.

लसूण - औषधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेले लसूण हे खराब बॅक्टेरिया नष्ट करण्यास सक्षम असते. ज्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो. तसेच श्वासाची दुर्गंधी रोखण्यास मदत होते. लसणाची ताजी फोड चघळावी किंवा लसणू वाटून त्यात थोडे मीठ घालून ते दातांना लावावे, थोड्या वेळाने वेदना कमी होऊन आराम मिळतो.

लवंग - दातदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगांचा वापर कित्येक शतकांपासून केला जातो. लवंगात युजेनॉल नावाचे नैसर्गिक जंतुनाशक असते. जे दातदुखीपासून आराम देते. जोजोबाचे तेल लवंगाच्या तेलात मिसळून ते कापसाच्या सहाय्याने दातांवर लावल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.