Tukaram Mundhe: ऑनलाइन मागवलेल्या वस्तूंवर एक्स्पायरी डेट नाही? आता काय करायचं? तुकाराम मुंढे म्हणाले…
Tukaram Mundhe: अनेकदा आपण ऑनलाइन वस्तू मागवतो. पण त्या वस्तूंवर एक्स्पायरी डेट नसते. अशा वेळी काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता स्वत: तुकाराम मुंढे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आजकाल अनेकजण घरबसल्या क्विक कॉमर्स सेवांच्या माध्यमातून किराणा, खाद्यपदार्थ आणि घरगुती वस्तू मागवतात. या वस्तू अवघ्या दहा मिनिटांत तुमच्या दारात येतात. मात्र या अतिवेगवान सेवेसोबतच अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत. अलीकडे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) काही क्विक कॉमर्स कंपन्यांच्या डार्क स्टोअर्सवर केलेल्या तपासणीत अनेक अनियमितता आढळल्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

तपासणीदरम्यान अनेक डार्क स्टोअर्समध्ये मुदत संपलेला माल, खाद्यपदार्थांच्या साठवणुकीतील मोठ्या त्रुटी आणि प्रचंड अस्वच्छता दिसून आली. सोशल मीडियावरही असे व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यात खाद्यपदार्थ साठवलेल्या जागी झुरळ फिरताना आणि मुदत संपलेले पदार्थ ठेवलेले दिसत होते. या कारवाईमुळे क्विक कॉमर्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, “क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खाद्यपदार्थ मागवल्यानंतर त्यावर उत्पादनाची तारीख किंवा मुदत संपण्याची तारीख स्पष्ट दिसत नसेल, तर ग्राहकांनी ते उत्पादन स्वीकारूच नये.”

ऑनलाइन किंवा दहा मिनिटांत विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांनाही अन्न सुरक्षा आणि लेबलिंगसंबंधीचे सर्व कायदेशीर नियम लागू होतात. पॅकेटवर आवश्यक माहिती किंवा लेबल नसेल, तर ग्राहकांनी थेट एफडीएच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

ग्राहकांना काही मिनिटांत सामान देणे हे या कंपन्यांचे वैशिष्ट्य असले, तरी डिलिव्हरीचा वेग वाढवण्याच्या स्पर्धेत अन्नाची सुरक्षितता आणि ग्राहकांचे मूलभूत अधिकार बाजूला ठेवले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा एफडीएकडून देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी विक्रेते आणि संबंधित प्लॅटफॉर्मची आहे.