
वरळी डोमच्या बाहेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची कमान लावण्यात आली आहे. ‘आवाज मराठीचा’ असा आशय या कमानीवर लावण्यात आला आहे. यावर एका बाजूला राज ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे.

सकाळी 11.30 वाजता ठाकरे बंधू वरळी डोमला पोहोचणार आहेत. वरळी डोममध्ये मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

व्यासपीठावर महाराष्ट्राचा झेंडा दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंचावर कोणत्याच पक्षाचा झेंडा नाही. कारण ठाकरे बंधूंनी मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था देखील करण्यात आली असून किती कार्यकर्त्ये उपस्थित राहतील हा आकडा सांगणं कठीण आहे. ज्यामुळे वरळी डोमच्या बाहेर देखील एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधूंचे जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत.

शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत सध्या उत्साहाचं वातावरण आहे.

ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत.