
मुंबईच्या बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली.

हा अपघात झाला तेव्हा पूलावर तब्बल 20 ते 25 मजूर काम करत होते. पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला.

मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्वजण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले आहेत. या मजूरांच्या दुखापतीचे स्वरुपत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले. त्यांनी जखमींना नाल्यातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तुर्तास तरी कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही.

उड्डाणपूलाचा गर्डर कसा पडला, याचे कारणही अद्याप समजलेले नाही. मात्र, यावरुन आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे.