शिट्या तर सोडाच, त्यांनी माझ्यावर दगडं मारली; कारण… वर्षा उसगावकरांनी सांगितला ‘तो’ भयानक किस्सा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव सांगितला आहे. औरंगाबादमध्ये शिकत असताना त्यांना एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. या भयानक अनुभवामागे मोठं कारणही होतं. नुकतेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से उलगडले.

गोव्यात जन्मलेल्या वर्षा उसगांवकर यांनी कॉमर्सची पदवी घेतल्यानंतर अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये 2 वर्षे नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतील व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
'ब्रह्मचारी' हे त्यांच्या सुरुवातीच्या काळातील गाजलेले नाटक होते. या नाटकात त्यांनी बिकिनीसारखा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. पहिल्यांदा रंगमंचावर जाताच प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवल्याने त्या घाबरल्या होत्या.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, "जेव्हा मी तो शॉर्ट ड्रेस घालून पहिल्यांदा स्टेजवर गेले तेव्हा कोणीतरी जोरात शिट्टी वाजवली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला."
दरम्यान, औरंगाबादमध्ये सितार शिकण्यासाठी जात असताना त्यांना वेगळाच अनुभव आला. स्कर्ट घातल्यामुळे काही लोकांनी त्यांच्या पायावर दगड मारण्यास सुरुवात केली. गुडघ्यापर्यंत असलेला स्कर्ट घालण्यावरून त्यांना हा त्रास सहन करावा लागला.
याबाबत वर्षा म्हणाल्या, "मला स्कर्ट घालायला आवडायचं. तो मिनी स्कर्ट सुद्धा नव्हता, गुडघ्यापर्यंत असायचा. त्यामुळे माझ्यासाठी तो कल्चरल शॉक होता. शिट्ट्या सोडाच माझ्यावर त्यांनी दगड मारले." असा धक्कादायक अनुभव त्यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.