
'हौसेला मोल नसते' ही म्हण वसईतील एका जिल्हा परिषद शिक्षकाने खरी करून दाखवली आहे. यासाठी निमित्त ठरलं की त्यांच्या लाडक्या मुलाचा शाळेतला पहिला दिवस.

वसईच्या कामन येथील रहिवासी असलेले नमित भोईर यांनी त्यांचा ४ वर्षांचा मुलगा रेयांश भोईर याला चक्क रोल्स रॉयससारख्या महागड्या गाडीतून पहिल्या दिवशी शाळेत सोडलं.

तसेच यावेळी गाड्यांचा भव्य ताफाही पाहायला मिळाला. ही 'शाही एन्ट्री' सध्या वसईत जोरदार चर्चेचा विषय बनली आहे.

पेशाने जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या नमित भोईर यांना लग्नाच्या सहा वर्षांनंतर पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.

रेयांशचा जन्म झाल्यावर एक महिना तो अतिदक्षता विभागात (ICU) होता.

त्यामुळे, भोईर कुटुंबीयांसाठी रेयांश हा केवळ मुलगा नसून, एक अनमोल भेट आहे. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला भोईर कुटुंब काहीतरी अविस्मरणीय करत असतात.

१२ जून रोजी रेयांशचा शाळेतील पहिला दिवस होता. हा दिवस त्याच्यासाठी अविस्मरणीय व्हावा आणि त्याला शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने नमित भोईर यांनी ही हटके कल्पना प्रत्यक्षात आणली.

त्यांनी खास रोल्स रॉयस गाडी भाड्याने आणली. इतकंच नाही, तर घरातील इतर गाड्याही आकर्षकपणे सजवून एक मोठा ताफा तयार केला. या शाही ताफ्यासह रेयांशला शाळेत सोडण्यात आलं.

वडिलांच्या या आगळ्यावेगळ्या प्रेमामुळे आणि प्रयत्नांमुळे रेयांशच्या शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण त्याच्या मनात कायम घर करून आहे, यात शंका नाही.

ही घटना केवळ चर्चेचा विषय ठरली नाही, तर पालकांच्या मुलांवरील निस्सीम प्रेमाचं एक अनोखं उदाहरणही बनली आहे.