
झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत सतत नकारात्मक घटना दाखवल्याचं पाहून प्रेक्षकसुद्धा वैतागले होते. अखेर आता यात असा ट्विस्ट पहायला मिळणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकही खुश झाले आहेत.

"ज्याला तुम्ही आदर्श भाऊ मानता, त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणं खूप जास्त गरजेचं होतं," असं म्हणत स्वानंदी अंशुमनचा एक व्हिडीओ कुटुंबीयांना दाखवते. तो व्हिडीओ पाहून समर्थसह सर्वांनाच मोठा धक्का बसतो. "विश्वास ठेवला रे तुझ्यावर, एवढा विकृत वागलास तू," अशा शब्दांत समर्थ त्याला फटकारतो.

इतकंच नाही तर समर्थ थेट अंशुमनच्या कानाखाली वाजवतो. यानंतर अंशुमनला श्वेताची माफी मागायला भाग पाडलं जातं. तेव्हा तो गुडघ्यावर बसून, हात जोडून श्वेताची माफी मागतो. अंशुमनच्या मनात प्रचंड राग असला तरी त्याला भावाखातर नमतं घ्यावं लागत आहे.

मालिकेत दाखवलेला हा सकारात्मक बदल पाहून प्रेक्षक खूपच खुश झाले आहेत. मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'देव पावला रे' असं एकाने लिहिलं. तर 'आता मालिकेला खूप सुंदर रंग आला आहे,' असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

'अरे एक नंबर स्वानंदी, फायनली सुख के दीन आये रे भैया,' अशीही कमेंट एका युजरने केली आहे. तर अनेकांनी मालिकेत सकारात्मक बदल दाखवल्याबद्दल लेखिकेचे आभार मानले आहेत. स्वानंदीच्या भूमिकेचंही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.