
झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. समर–स्वानंदीच्या कुटुंबात घडलेल्या अलीकडील घटनांनी घरातील वातावरणाला नवं वळण दिलं आहे.

स्वानंदीच्या वडिलांनी राजवाडे घरातील दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही रक्कम राजवाडे यांच्या घरी परत देण्यासाठी जात असताना अंशुमनने गुंडांकरवी ती रक्कम चोरी केली, ज्यामुळे स्वानंदीचे बाबा अत्यंत दुःखी झाले.

ही परिस्थिती हाताळताना स्वानंदीने पोलिसांची मदत घेऊन चोरी गेलेली रक्कम शोधून काढली आणि ती त्वरित राजवाडे कुटुंबाकडे परत दिली. तिच्या या प्रामाणिक आणि निर्णायक कृतीमुळे बाबा आणि समरमधील तणाव कमी झाला. समरला प्रथमच जाणवल की या घरातील सर्वजण वाईट नाहीत आणि गैरसमजांवर पडदा टाकण्याची वेळ आली आहे.

याचदरम्यान, समरच्या सतत नाक बंद राहण्याच्या त्रासामुळे आणि औषधांमुळे स्वानंदीने त्याच्या आरोग्याकडे पाहून त्याला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या मार्गदर्शनामुळे समरला शारीरिक आणि मानसिक आरामाची नव्याने ओळख होते, यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होताना दिसणार आहेत.

दुसरीकडे, अधिराला सततच्या कौटुंबिक दडपणामुळे मानसिक थकवा जाणवत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिने डंबेल्स आणि मोठा स्पीकर अशा जिम साधनांची व्यवस्था करून घरातच जोरदार झुम्बा सुरू करायचा निर्णय घेतलाय. या मोठ्या आवाजामुळे घरातील मोठ्यांना तसंच शेजाऱ्यांना त्रास होऊ लागतो.

शेवटी शेजारी वर येऊन आवाजाबाबत नाराजी व्यक्त करतात आणि अधिरावर समाजातील शांतता भंग केल्याचा आरोप करतात. या संपूर्ण घटनेने कुटुंबातील बदलतं समीकरण आणि प्रत्येकाच्या संघर्षांचे नवे पैलू समोर येतात.