
पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि बविआमध्ये नालासोपाऱ्यात तुफान राडा सुरू आहे.भाजपचे नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे.

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. पैशांच्या बंडलाचे फोटो आता समोर आले आहेत.

विनोद तावडे यांच्यासोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक हे देखील आहेत.नालासोपाऱ्यात पैसे वाटपावरून जोरदार राडा सुरू आहे.

दरम्यान तावडे यांनी पाच कोटी रुपये आणले, पैसे वाटत असल्याची टीप आम्हाला भाजपकडूनच मिळाली असा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

“पाच कोटीच वाटप चालू आहे. मला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती आहे” असा दावा देखील हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

“भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आलाय. पोलिसांनी कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही सोडू. मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे” असं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आता या सर्व प्रकरणावर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे, या घटनेची चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलं आहे.