
नव्या महिन्याची सुरुवात झाली की नोकरदारांचा पगार होतो. पण अनेकांचा महिन्याच्या शेवटी हा पगार संपूनही जातो. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या दिवसात तर अनेकांकडे महत्त्वाच्या कामासाठी पैसेही शिल्लक राहात नाहीत.

अशा स्थितीत रोजची महत्त्वाची कामे करण्यासाठीच पैसे शिल्लक नसल्यामुळे गुंतवणूक कशी करायची? पैसे कसे वाचावायचे? असा प्रश्न बहुसंख्य नोकरदारांपुढे उभा राहतो. मात्र पैसे वाचवायचे असतील, गुंतवणूक करायची असेल तर एक फॉर्म्यूला तुमची मदत करू शकतो.

पैसे वाचवावयचे असतील तर तुम्ही 50-30-20 या सूत्राचा उपयोग करू शकता. या सूत्राचा उपयोग केल्यास तुम्ही तुमच्या महिन्याभराच्या खर्चाचे व्यवस्थित नियोजन करू शकता. तसेच तुम्हाला पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी गुंतवताही येतील. अनेकजण याच सूत्राचा वापर करून आपले पैसे वापरतात.

50-30-20 या सूत्रामध्ये तुमच्या एकूण पगारातील 50 टक्के रक्कम ही गरजेच्या आणि न टाळता येणाऱ्या कामांसाठी खर्च करावी. यामध्ये किराणा, घराचे भाडे, विजेचे बील, वीमा आदी खर्च येईल. त्यानंतर 50-30-20 या सूत्रातील 30 या आकड्यानुसार तुम्हाला काही गोष्टी करण्याची इच्छा असेल तर त्यावर 30 टक्के पगार खर्च करा. यामध्ये प्रवास, रेस्टॉरंट, शॉपिंग अशा गोष्टींचा समावेश आहे.

तुमच्या पगारातील उर्वरीत 20 टक्के रक्कम ही बचतीसाठी तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरा. यात एसआयपी, आपत्कालीन रक्क्म, क्रेडिट कार्डचे बील यांचा समावेश होईल. अशा प्रकारे 50-30-20 या सूत्राचा वापर केल्यास तुम्हाला तुमच्या पैशांचे नियोजन लावता येईल.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)