
स्वयंपाक घरात रात्री झुरळांचं राज्य असतं. रेस्टॉरंट, हॉटेलच्या किचनपासून ते सांडपाण्यापर्यंत यांची वर्दळ सहज दिसून येते. रात्री तर ते हमखास दिसून येतात. त्यांच्यासाठी पेस्ट कंट्रोल करा की अजून काही उपाय करा. काही दिवसांनी हा प्राणी दोन अँटिन्यासह तुम्हाला खिजवतोच.

जगात झुरळांच्या जवळपास 4500 हून अधिक जाती असल्याचे विज्ञान सांगते. पण यातील जवळपास 30 प्रजाती या मानवी वस्तीभोवती दिसतात. त्यातील काही थेट माणसाच्या स्वयंपाक घरावर कब्जा करतात. काही घरातील मोठ मोठ्या फटीत त्यांचे जग चालवतात.

प्राणी तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीवरील प्राचीन प्राण्यांमध्ये झुरळांचा क्रमांक सर्वात वरचा आहे. कारण ते 35 कोटी वर्षांपूर्वी सुद्धा झुरळ होती आणि आजही त्यांचे वंशज प्रत्येक वातावरणात तग धरून आहेत. निसर्गाच्या वरदानामुळे त्यांना नष्ट करता आलेले नाही. त्यांच्यानंतर आलेले डायनासोर गायब झाले. पण झुरळ अजूनही आहेत.

तर झुरळाच्या शरिरात गँगलियोन असते. जसे मानवाकडे मेंदू असतो आणि तो शरिरावर नियंत्रण ठेवतो. तसेच झुरळाच्या शरीरात तीन गँगलियोन असतात. एक डोक्यात एक पोटात आणि मध्य भागी असते. त्यामुळे झुरळाचे डोके जरी तुटले अथवा ठेचल्या गेले तरी शरीरातील इतर गँगलियोन शरीराचे काम सुरुच ठेवतात.

झुरळाच्या शरिरात अनेक छोटे छोटे छिद्र असतात. त्याला स्पायरकेल्स म्हणतात. येथून झुरळ श्वास घेते. ते शरिराच्या विविध भागात असल्याने गॅस एक्सचेंज होतो. त्यामुळे डोके जरी तुटले तरी झुरळ जीवंत राहते.

झुरळ काहीही न खाता एक महिना जिवंत राहू शकते. तर पाण्याविना एक आठवडा जिवंत राहू शकते. जेव्हा याचे डोके तुटते तेव्हा झुरळ जवळपास एक आठवडा जिवंत राहते. पण डोके तुटल्यावर तोंड नसल्याने त्याला पाणी पिता येत नाही आणि ते एक आठवड्यानंतर मरते. एक झुरळ साधारणपणे एक वर्षे जगते आणि या काळात अनेक झुरळ जन्माला घालते.