
अभिनेत्री करीना कपूरला सिनेसृष्टीत 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात करीनाचं अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं नव्हतं. अनुभवानुसार तिने तिच्या कामात काही बदल केले.

करीनाने 'रेफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चनने तिच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. 'रेफ्युजी'मध्ये करीना आणि अभिषेकची लव्ह-स्टोरी दाखवण्यात आली. मात्र करीनाने शूटिंगदरम्यान अभिषेकसोबत रोमँटिक सीन करण्यास थेट नकार दिला होता.

करीनाने हा किस्सा सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये सांगितला. या शोमध्ये सिमीने अभिषेक बच्चनला व्हिडीओ कॉल केला होता. तेव्हा अभिषेकने तिला सांगितलं की तो त्याच्या पहिल्या चित्रपटातील रोमँटिक सीन कधीच विसरू शकत नाही. कारण करीनाने तो सीनच करण्यास नकार दिला होता.

अभिषेकने पुढे सांगितलं की शूटिंगदरम्यान दिग्दर्शकांनी जेव्हा करीनाला रोमँटिक सीनबद्दल सांगितलं, तेव्हा करीना नकार देत म्हणाली, "हे कसं होऊ शकतं? तो माझ्या भावासारखा आहे. त्याच्यासोबत मी रोमान्स कसं करू शकते?"

करीना आणि अभिषेक यांचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र या चित्रपटातील भूमिकेसाठी करीनाला सर्वोत्कृष्ट डेब्युचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सध्या करीना तिच्या आगामी 'क्रू' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये ती क्रिती सनॉन आणि तब्बू यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे.