
बॉलिवूडचा 'खलनायक' अर्थात अभिनेता संजय दत्तचं आयुष्य खुल्या किताबाप्रमाणे आहे. वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक, त्याने त्याच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. आता तो तिसरी पत्नी मान्यता दत्ता आणि मुलांसोबत आनंदात आयुष्य जगतोय. गेल्या वर्षी लग्नाच्या 16 व्या वाढदिवशी त्याने पुन्हा एकदा मान्यताशी लग्न केलं. परंतु संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लई सध्या कुठे आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

संजय दत्तने तीन वेळा लग्न केलंय. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्याने 1998 मध्ये मॉडेल रिया पिल्लईशी दुसरं लग्न केलं होतं. परंतु या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 2008 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

संजय दत्तने रिया पिल्लईशी साईबाबांच्या मंदिरात लग्न केलं होतं. परंतु विवाहित असताना तिचं नाव टेनिस स्टार लिएंडर पेसशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर ती संजय दत्तशी विभक्त होऊन भारतीय खेळाडूसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. रिया आणि लिएंडर यांना एक मुलगी आहे. 2005 मध्ये तिने मुलीला जन्म दिला.

रिया आणि लिएंडरने कधीच लग्न केलं नव्हतं. नात्यात कटुता आल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. रियाने लिएंडर पेसविरोधात 2014 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. सध्या ती एकटीच राहत असून मुलगी अयानाचं संगोपन करतेय.

रिया पिल्लई सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सतत ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबतचे आणि मुलीसोबतचे फोटो शेअर करत असते. रियाने बऱ्याच काळापूर्वी मॉडेलिंग सोडलं होतं. आता ती फॅशन डिझायनर म्हणून काम करतेय. रियाचा 'द टेंपल हाऊस बाय रिया पिल्लई' नावाचा ब्रँड आहे.

रिया पिल्लईचे इन्स्टाग्रामवर दोन अकाऊंट आहेत. तिच्या दुसऱ्या अकाऊंटचं नाव Rhea Talks असं आहे. ती अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना खूप मानते. योगसाधना, ध्यानसाधना यांविषयी ती मोकळेपणे व्यक्त होते.

फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की रिया पिल्लईचं एका शाही कुटुंबाशी जवळचं नातं आहे. ती हैदराबादच्या महाराजा नरसिंहगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे.