
श्रावण महिना हा भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे या पवित्र महिन्यात अनेक लोक उपवास करतात, पूजा-अर्चा करतात. श्रावण महिन्यात दारु पिऊ नये, असे अनेकदा म्हटले जाते. पण या काळात दारू पिणं का टाळावं? यामागे काही धार्मिक किंवा वैज्ञानिक कारण आहे का, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

श्रावण महिन्यात दारू न पिण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर आरोग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे. श्रावण महिना हा मन आणि शरीर शुद्ध ठेवण्याचा काळ आहे. दारू पिणं हे वाईट सवयींमध्ये गणलं जातं, ज्यामुळे आपलं मन अशुद्ध होतं.

जेव्हा आपलं मन अशुद्ध असतं, तेव्हा देवाचं नाव घेणं किंवा पूजा करणं यात लक्ष लागत नाही. त्यामुळे या काळात दारु पिणे टाळावे, असे सांगितले जाते. जेणेकरून मन शांत आणि एकाग्र होऊन अध्यात्मिक साधना चांगली करता येते.

श्रावण महिना म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा आणि चांगल्या सवयी लावण्याचा काळ असतो. दारु प्यायल्याने माणसाचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं, तो मनाला वाटेल तसं वागतो.

त्यामुळे श्रावणात दारू टाळल्याने आपल्याला आपल्या भावना आणि सवयी कशा नियंत्रित करायच्या हे शिकता येते. त्यामुळे श्रावण महिना फक्त देवासाठीच नाही, तर स्वतःला शिस्त लावण्यासाठीही महत्त्वाचा आहे.

श्रावण महिन्यात दारु पिणं टाळण्यामागे आरोग्याची महत्त्वाची कारणं आहेत. श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो. पावसाळ्यामुळे आपलं शरीर आणि पचनशक्ती दोन्ही कमजोर झालेली असते.

पावसाळ्यात वातावरणामुळे आपली पचनशक्ती आधीच कमजोर होते. त्यात दारू पचायला खूप जड असते. त्यामुळे ती प्यायल्यास पोटाचे त्रास, ॲसिडिटी आणि अपचन होऊ शकतं. यामुळे श्रावणात दारु न पिण्याचा सल्ला दिला जातो.

पावसाळ्यात अनेक रोग पसरतात. दारूमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे, तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. तसेच दारुमुळे कॉलरा किंवा फूड पॉयजनिंगसारखे आजार सहज होऊ शकतात.

दारूचा सर्वात जास्त परिणाम लिव्हरवर (यकृत) होतो. पावसाळ्यात लिव्हरवर आधीच ताण असतो. अशा वेळी दारू प्यायल्यास लिव्हरला जास्त काम करावं लागतं. त्यामुळे लिव्हरचे आजार होऊ शकतात.

दारू प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती आधीच कमजोर झालेली असतो. त्यात पाण्याची कमतरता आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

यामुळे थोडक्यात सांगायचं झाल्यास श्रावण महिन्यात दारू न पिण्याची परंपरा ही केवळ श्रद्धेचा भाग नाही, तर आपल्या शरीराला आणि पर्यावरणाला अनुकूल अशी एक आरोग्यदायी सवय आहे. या काळात दारु पिणं टाळल्याने आपलं शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहण्यास मदत होते.