
आपण अनेकदा पाहिलं असेल की रात्रीच्या वेळी कुत्रे जोरजोरात भुंकत असतात. काही वेळा कुत्रे रडतानाही दिसतात. रात्री कुत्र्याचं रडणं आणि भुंकणे ऐकल्यानंतर आपल्याला अनेकदा भीती वाटते. पण कुत्रे रात्रीच्या वेळी भुंकण्यामागे एक विशिष्ट कारण आहे.

रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे भुंकणे आणि रडणे याची अनेकदा भीती घातली जाते. कुत्र्यांना रात्री भुते किंवा आत्मे दिसतात, म्हणूनच ते भुंकतात किंवा रडतात, असे म्हटले जाते. पण यामागे वेगळी वैज्ञानिक कारणं आहेत.

अनेक वर्षांपासून अशी एक समजूत आहे की कुत्र्यांना भूत दिसते. ते त्यांच्या डोळ्यांनी भुते पाहू शकतात. त्यांच्या डोळ्यांची आणि संवेदनांची क्षमता मानवापेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यांना अदृश्य शक्ती दिसतात.

जेव्हा कुत्र्यांना अशी नकारात्मक ऊर्जा जाणवते, तेव्हा ते भुंकायला किंवा रडायला लागतात, असे म्हटले जाते. कुत्र्यांचे रडणे अशुभ मानले जाते. यामागे काहीतरी वाईट घटना घडणार आहे, असे सांगितले जाते. मात्र वैज्ञानिक संशोधनानुसार, कुत्र्यांच्या भुंकण्यामागे काही वेगळी कारण आहेत.

कुत्र्यांची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता मानवापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. कुत्रे मानवाच्या श्रवण मर्यादेपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू शकतात. रात्री वातावरण शांत असते. त्यामुळे त्यांना दूरवरून लहान प्राण्यांचे, पक्ष्यांचे, किंवा वाहनांचे आवाज सहज ऐकू येतात. ज्यामुळे ते सावध होतात आणि भुंकून प्रतिक्रिया देतात.

कुत्र्यांचे नाक अत्यंत तीक्ष्ण असते. मानवाच्या तुलनेत त्यांच्या नाकात 40 पट अधिक संवेदनशील पेशी असतात. त्यामुळे त्यांना अनोळखी व्यक्ती किंवा प्राण्यांचा वास लगेच जाणवतो. रात्रीच्या वेळी अशा वासांची जाणीव झाल्यास ते भुंकून इशारा देतात.

कुत्रे हे सामाजिक प्राणी आहेत आणि त्यांना एकटेपणा आवडत नाही. जर त्यांना रात्री एकटे किंवा असुरक्षित वाटले, तर ते आपली भीती लपवण्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी भुंकतात.

कुत्रे त्यांच्या क्षेत्राबद्दल खूप जागरूक असतात. त्यांना त्यांच्या भागात कोणताही अनोळखी व्यक्ती किंवा प्राणी आल्यास, ते भुंकून त्याला दूर घालवण्याचा प्रयत्न करतात. रात्रीच्या वेळी असे आवाज आल्यास ते अधिक सावध होतात.

कुत्र्यांचे रात्री भुंकणे हे त्यांच्या नैसर्गिक स्वभावाचा भाग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, यामागे भूत दिसण्याचा काहीही पुरावा नाही. त्यामुळे, कुत्र्यांच्या भुंकण्याकडे भीतीचे प्रतीक म्हणून न पाहता, त्यांच्या नैसर्गिक सवयींचा एक भाग म्हणून पाहणे योग्य ठरेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)