
एखाद्या व्यक्ती दारु पिणारा असू दे किंवा नाही, पण त्याला चकणा माहिती नाही, असा माणूस आपल्याला क्वचितच सापडेल. चकणा हा शब्द आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत आहे. हा केवळ एक पदार्थ नसून दारू पिण्याच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.

चकणा म्हणजे अगदी चणे, शेंगदाण्यापासून ते चिली चिकनपर्यंत काहीही असू शकतं. दारूचा कडवटपणा कमी करण्यासाठी किंवा पिण्याचा आनंद वाढवण्यासाठी चकण्याचा वापर केला जातो.

दारूशिवाय चकणा असू शकतो, पण चकणाशिवाय दारूची कल्पनाच अनेकांना अपूर्ण वाटते. त्यामुळे दारु पिताना आपल्याला सोबत कायमच चकणा पाहायला मिळतो. पण तुम्ही कधी एक गोष्टी पाहिलीत का, अनेकदा दारु पिताना चकणा म्हणून शेंगदाणे दिले जातात.

दारु आणि शेंगदाण्याचे एक अनोखं नातं आहे. तिखट शेंगदाणे, खारट शेंगदाणे किंवा अगदी साधे शेंगदाणे चकणा म्हणून देण्यात येतात. चकण्यांमध्ये अनेक पदार्थ असले तरी शेंगदाणे आजही सर्वात लोकप्रिय आहेत.

उकडलेल्या अंड्यांप्रमाणेच शेंगदाणे हे स्वस्त, सहज उपलब्ध आणि चविष्ट असतात. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता जास्त आहे. यात व्हिटॅमिन B9 सारखी काही पोषक तत्वंही असतात. पण, फक्त याच कारणामुळे शेंगदाणे खाल्ले जातात असं नाही.

यामागे एक रंजक कारण दडलेलं आहे, जे फार कमी लोकांना माहीत आहे. यामागचं सोपं कारण आहे की, शेंगदाणे खाल्ल्यावर लवकर तहान लागते. जर तुम्ही खारट किंवा मीठ असलेले शेंगदाणे खात असाल तर ही तहान आणखी वाढते. मीठ आपल्या शरीरातील पाणी शोषून घेतं.

शेंगदाणे खाल्ल्यावर आपलं तोंड आणि घसा कोरडा होतो. त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा काहीतरी पिण्याची इच्छा होते. यामुळे दारु पिणारी व्यक्ती नकळतपणे जास्त दारू पिते. याचाच अर्थ शेंगदाणे हे केवळ चवीसाठी नसून त्याचा वापर मद्यपान वाढवण्यासाठीही केला जातो.

याच कारणामुळे आजही अनेक बार आणि पबमध्ये दारुसोबत चकणा म्हणून शेंगदाणे दिले जातात. तसेच ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध देखील असतात. विशेष म्हणजे दारुसोबत शेंगदाणे हे मद्यपींची पहिली पसंती असतात.