
नवीन वर्ष आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. वर्षाचा पहिला महिना जानेवारी आणि शेवटचा महिना डिसेंबर हे गणित आता आपल्या सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे.

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मानवी इतिहासात सुरुवातीला वर्षात १२ महिने नव्हते, तर फक्त १० महिने होते. मग हे बदल कसे झाले आणि फेब्रुवारीमध्येच कमी दिवस का असतात? यामागचे रंजक शास्त्र आणि इतिहास समजून घेऊया.

प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये सुरुवातीला मार्च ते डिसेंबर असे केवळ १० महिने असायचे. यामुळे ऋतू आणि कापणीच्या वेळेचे गणित चुकू लागले. साधारण ६९० ईसापूर्व काळात रोमन राजा नुमा पोम्पिलियस याने कॅलेंडरमध्ये सुधारणा करण्याचे ठरवले.

त्याने वर्षातील ३६५ दिवसांचे योग्य नियोजन करण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन नवीन महिने जोडले. सौर वर्षाचे ३६५ दिवस पूर्ण करण्यासाठी कॅलेंडरमध्ये फेरबदल करण्यात आले.

जानेवारीला वर्षाचा पहिला महिना मानले गेले, तर फेब्रुवारी हा महिना सर्वात शेवटी जोडला गेला होता. उरलेले दिवस फेब्रुवारीच्या वाट्याला आल्यामुळे या महिन्यात २८ किंवा २९ दिवस असतात.

वर्षात १२ महिने असण्यामागे मुख्य कारण म्हणजे चंद्र चक्र (Lunar Cycle). चंद्राला स्वतःच्या सर्व कला पूर्ण करण्यासाठी (पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत) सुमारे २९.५ दिवस लागतात. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करते. तोपर्यंत चंद्राची साधारण १२ चक्रे पूर्ण झालेली असतात.

याच खगोलीय घटनेचा आधार घेऊन सुमेरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतींनी १२ महिन्यांचे कॅलेंडर तयार केले. १२ ही संख्या गणितीदृष्ट्या अत्यंत सोयीस्कर मानली जाते. १२ या संख्येला २, ३, ४ आणि ६ ने सहज भाग जातो.

यामुळे वर्षाचे तिमाही (Quarterly) किंवा सहामाही भागात विभाजन करणे प्रशासकीय आणि व्यावसायिक कामांसाठी सोपे झाले. थोडक्यात सांगायचे तर, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणारा वेळ (३६५ दिवस) आणि चंद्राच्या हालचाली यांचा मेळ घालण्यासाठी १२ महिन्यांची ही पद्धत जगभरात स्वीकारली गेली.