
भारतात वाईन पिणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. पण द्राक्षापासून बनणारी ही वाईन महागणार असल्याचे एकूणच चित्र आहे. कारण बरेच महिने पडलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पन्न घटले आहे. त्यामुळे वाईनची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65 टक्के घट झाली आहे. याचा थेट परिणाम वाईन उद्योगावर होणार असून, वाईन उत्पादनात 50 ते 60 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी अडीच ते तीन कोटी लिटर वाईन तयार होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाईन प्रेमींसाठी ही अतिशय वाईट बातमी असल्याचे समोर आले आहे.

द्राक्षांच्या तुटवड्यामुळे बेदाणा व्यावसायिक आणि वाईन उद्योगात खरेदीसाठी स्पर्धा वाढणार असून, द्राक्ष उत्पादकांना प्रति किलो सुमारे दोन रुपये अधिक दर मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, महाग दराने द्राक्ष खरेदी करावी लागल्याने वाईनच्या दरात वाढ होण्याचे संकेत ऑल इंडिया वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी दिले नाशिक जिल्ह्यात सध्या 38 वायनरी कार्यरत असून, येथे व्हाईट, स्पार्कलिंग आणि पोर्ट वाईनचे उत्पादन घेतले जाते.