
उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प या वर्ष अखेरीस पूर्ण होणार आहे. जम्मूमधील रामबनमधील संगलदान आणि रियासी दरम्यान पहिल्या रेल्वेची यशस्वी चाचणी झाली. ही रेल्वे चिनाब पुलावरुन जाणार आहे. हा पूल जगातील सर्वात उंच पूल आहे.

46 किमी लांब संगलदान-रियासी मार्गाचे आता 27 आणि 28 जून रोजी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त डीसी देशवाल तपासणी करणार आहे. या तपासणीपूर्वी उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहे, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

चिनाब ब्रिज पॅरिसमधील एफिल टॉवरपेक्षा उंच आहे. एफिल टॉवरची उंची 330 मीटर तर चिनाब पुलाची उंची 359 मीटर आहे. आता संगलदान मार्गावरुन इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनाची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर या मार्गावरुन पहिली रेल्वे 30 जून रोजी धावणार आहे.

USBRL प्रोजेक्ट 1997 मध्ये सुरु केला होता. 272 किमी मार्गावर रेल्वे लाईन उभारण्यात आली. आतापर्यंत 209 किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत रियासीला कटराला जोडणारी 17 किमी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होईल. ज्यामुळे कश्मीर देशातील इतर भागाशी जोडला जाणार आहे.

चिनाब पुलामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. हा पूल अखनूर भागात तयार झाला आहे. अखनूर भाग हा काश्मीरचा चिकन नेक आहे. यामुळे या ठिकाणी पूल होणे भारतासाठी खूप महत्वाचे होते. या पुलामुळे आता कोणत्याही ऋतूत भारतीय सेना रेल्वेने या भागात जाऊ शकते. यामुळे पाकिस्तानसाठी हा चिंतेचा विषय आहे.