Agnipath Scheme : ‘अग्निवीर योजनेमागे भाजप, RSSचा गुप्त अजेंडा, त्यांना नाझीसारखी सेना उभी करायचीय’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

| Updated on: Jun 18, 2022 | 7:05 PM

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केलाय. अग्निवीर या योजनेमागे भाजप आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. त्यांना नाझीसारखी सेना निर्माण करायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

Agnipath Scheme : अग्निवीर योजनेमागे भाजप, RSSचा गुप्त अजेंडा, त्यांना नाझीसारखी सेना उभी करायचीय, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
नरेंद्र मोदी, प्रकाश आंबेडकर
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अग्निपथ योजनेवरुन (Agnipath Scheme) देशातील 4 राज्यात अग्नितांडव पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि तेलंगणात (Telangana) अग्निपथ योजनेविरोधात जोरदार आंदोलनं करण्यात आलीय. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळालं. अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी पोलीस ठाणे, रेल्वे स्टेशन, रेल्वे गाड्यांना आग लावण्यात आली. महाराष्ट्रातही या योजनेला आता राजकीय स्तरावर मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. अग्निवीर या योजनेमागे भाजप आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. त्यांना नाझीसारखी सेना निर्माण करायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

‘अग्नीवीर या योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे.सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल’, असं ट्वीट करत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय.

दीपाली सय्यद यांचाही संघ आणि मोदींवर निशाणा

दीपाली सय्यद यांनी ट्विटरवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. ‘2024 च्या निवडणुकीत अगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे. नाहीतर याचे पडसाद निवडणुकीला दिसतील याची भीती भाजपला आहे. अग्निपथ कितीही देशाच्या सुरक्षेच्या हेतुने विरोध जरी झाले, नुकसान झाले तरी निवडणूक महत्वाची हे मोदींजींचे धोरण चुकीचे आहे’, अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी मोदी आणि संघावर टीका केली.

मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान – राष्ट्रवादी

पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलीय.