मोठी बातमी! अजितदादा-शरद पवारांची युती होता-होता राहिली; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

शरद पवार आणि अजित पवार यांच्या होता-होता राहिलेल्या एका युतीची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

मोठी बातमी! अजितदादा-शरद पवारांची युती होता-होता राहिली; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
sharad pawar and ajit pawar
| Updated on: Jun 24, 2025 | 9:17 PM

Ajit Pawar And Sharad Pawar : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. 22 जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले. दरम्यान आता माळेगाव कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी पडद्यामागे आखलेल्या डावपेचांची मोठी माहिती समोर आली आहे. पडद्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांच्या युतीसाठी प्रयत्न चालू होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जागावाटपासांदर्भात त्रयस्तांच्या मार्फत प्रस्तावही आला होता, असं खुद्द अजित पवार यांनीच कबूल केलं आहे. त्यामुळे एकीकडे अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष एकत्र येण्याबाबतची चर्चा चालू असताना आता होता-होता राहिलेल्या या युतीची सगळीकडेच चर्चा होत आहे.

…ते माझ्याशी बोलत होते

अजित पवार यांनी 24 जून रोजी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी शरद पवार यांनी तुम्हाला काही ऑफर दिली होती का? तुमच्या पॅनलमध्ये येण्यासंदर्भात काही बोलणं झालं होतं का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना, यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली नाही. पण तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप ज्यांना एस एन जगताप वकील या नावाने ओळखलं जातं ते माझ्याशी बोलत होते. त्यांची आणि माझी दोन ते तीन वेळा चर्चा झाली होती, अशी थेट कबुली अजित पवार यांनी दिली.

अजितदादांनी उत्तर देण्याचं टाळलं

त्यानंतर तुम्ही शरद पवार यांना किती जागा देणार होते? शरद पवार यांच्याकडून किती जागांचा प्रस्ताव आला होता? असे काही प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी या प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळलं.

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाची चर्चा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांनीही एकत्र आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली होती. त्यामुळे आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजितदादा यांच्यात त्रयस्थाच्या मध्यस्थीने चर्चा झाल्याचे समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.