अजित पवारांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले; गोपीचंद पडळकरांचा घणाघाती आरोप

| Updated on: Apr 14, 2021 | 12:10 PM

जवळपास 300 ते 400 कोटींची संपत्ती असणारे हे कारखाने अजित पवार यांनी पाच, सहा, दहा कोटी, अशा कवडीमोल दराने विकत घेतले आहेत | Gopichand Padalkar Ajit Pawar

अजित पवारांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले; गोपीचंद पडळकरांचा घणाघाती आरोप
अजित पवार आणि गोपीचंद पडळकर
Follow us on

पंढरपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले, असा घणाघाती आरोप भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. शरद पवार यांचं अख्खं कुटुंब सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आलं आहे. मात्र, त्यांना या पंढरपूर-मंगळवेढाच्या निवडणुकीशी (Pandharpur Bypoll) काहीही देणघेणं नाही. त्यांचा डोळा हा विठ्ठल कारखान्यावर आहे. हा कारखाना त्यांना घशात घालायचा आहे. काही दिवसांपूर्वीच करारपत्र करुन आदिनाथ कारखाना पवारांच्या नातवाने घशात घातला, अशी टीका त्यांनी केली. (BJP leader Gopichand Padalkar slams NCP Ajit Pawar)

ते बुधवारी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत पवार कुटुंबीयांचा समाचार घेतला. राज्यातील शेतकरी आणि सभासदांच्या पैशांवर हे साखर कारखाने चालतात. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचं मंगळसूत्र मोडून या कारखान्यांमध्ये पैसे भरले आहेत. जवळपास 300 ते 400 कोटींची संपत्ती असणारे हे कारखाने अजित पवार यांनी पाच, सहा, दहा कोटी, अशा कवडीमोल दराने विकत घेतले आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘मराठा आरक्षणाच्यादृष्टीने हे सरकार पांढऱ्या पायाचं’

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने महाविकासआघाडी हे पांढऱ्या पायाचं सरकार आहे. भाजपमध्ये सर्वात जास्त आमदार हे मराठा आणि ओबीसी समाजाचे आहेत. तरीदेखील महाविकासआघाडीचे नेते भाजप जातीयवादी असल्याचे आरोप करतात.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गरीबाच्या पोराला भाजपने मंत्री केल्याची अनेक उदाहरणे आहेत. सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर ही त्याची उदाहरणे आहेत. याउलट महाविकासआघाडी सरकारमध्ये घराणेशाही आहे, असे पडळकर यांनी म्हटले.

‘पंढरपूरातील गावांच्या पाण्याचा प्रश्न केंद्रातून पैसे आणून सोडवू’

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील. ही केवळ एका मतदारसंघाची निवडणूक नाही तर संपूर्ण राज्याच्या जनतेचं प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात. पंढपुरातील 35 गावांच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने पैसे दिले नाही तर आम्ही केंद्रातून पैसे आणू, असे आश्वासनही गोपीचंद पडळकर यांनी दिले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown | राज्यात संचारबंदी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी नियम काय?

पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का; गोपीचंद पडळकरांचा अजितदादांवर पलटवार

अजित पवार हसले, म्हणाले, प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, कशाला नोंद घेताय!

(BJP leader Gopichand Padalkar slams NCP Ajit Pawar)