राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचे बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत

Ajit Pawar: बारामतीकरांना न सांगता सर्व मिळत गेले. न सांगता रस्ते होत गेले. न सांगता पिण्याच्या पाण्याची योजना आली. मेडीकल कॉलेज न मागता मिळले. आयुर्वेदीक कॉलेज मिळाले. सध्या बारामती शहर सोडून इतर मतदार संघात ७५०कोटींची कामे चालू आहेत.

राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचे बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत
Ajit Pawar
| Updated on: Sep 08, 2024 | 2:33 PM

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मी सोडून इतर मिळाल्यावर तुलना करा

अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘एकच दादा अजित दादांचा’ घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जेथे पिकते तेथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा.

न सांगता सर्व मिळत गेले…

बारामतीकरांना न सांगता सर्व मिळत गेले. न सांगता रस्ते होत गेले. न सांगता पिण्याच्या पाण्याची योजना
आली. मेडीकल कॉलेज न मागता मिळले. आयुर्वेदीक कॉलेज मिळाले. सध्या बारामती शहर सोडून इतर मतदार संघात ७५०कोटींची कामे चालू आहेत.

पाच वर्षांत इतकी कामे राज्यात झाली नाही

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. काहींचे राजीनामे घेतले. त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे. पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका घेऊ नका. काही चूकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा. महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. काही वेगळ्या अफवा उठल्या तर लगेच विश्वास ठेवू नका. राज्याची जबाबदारी राष्ट्रवादीने मला दिली. मला राज्यात फिरावेच लागेल.

रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो. शेवटी निर्णय मीच घेतो. पण मतं जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होता. आजही मी मनिवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचंही मत जाणून घेत असतो.