अविश्वास ठरावाच्या पत्रावर विरोधी पक्षनेत्याची सही आवश्यक नाही, विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे काय म्हणाले?

| Updated on: Dec 30, 2022 | 3:01 PM

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाच्या पत्राची मला कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी काल दिली.

अविश्वास ठरावाच्या पत्रावर विरोधी पक्षनेत्याची सही आवश्यक नाही, विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह (Nana Patole) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 39 आमदारांनी विधानसभा सचिवांना तसे पत्र दिले आहे. मात्र या पत्रावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची सही नाही. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या पत्राचं पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेत्याची सही असणं आवश्यक नाही. ही सही नसली तरीही प्रधान सचिव आणि अधिकारी त्यावर निर्णय घेऊ शकतात.

विधानसभा नियमांची माहिती देताना अनंत कळसे म्हणाले, ‘ नियम 109 मध्ये अशी तरतूद आहे की, एकाच अर्थाचा ठराव मान्य होऊन झाल्यानंतर तर त्याच अर्थाचा समांतर ठराव एक वर्ष आणता येणार नाही.

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून नुकतेच निवडून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणता येणार नाही. विधीमंडळाचे प्रधान सचिव, अधिकारी आणि अध्यक्ष निश्चित घेतील….

हा प्रस्ताव सादर केल्यानंतर 14 दिवसांचा नोटीस कालावधी असतो. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रस्तावावर निर्णय होईल. तो घटनात्मक दृष्टीने योग्य आहे की नाही, याचा निर्णय तत्कालीन अध्यक्ष घेतील…

अजित पवार काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाच्या पत्राची मला कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी काल दिली. तसेच माझ्या माहितीप्रमाणे किमान वर्षभर अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडता येत नाही. या तांत्रिक अडचणींमुळे माझ्या सहीचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.